सुभाष मारवाडे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित.

गोंदिया :शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. आपल्या कर्तृत्वाने व नवोन्मेषी कार्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील सुपुत्र सुभाष आसाराम मारवाडे यांना राज्य सरकारचा मानाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून, हा सत्कार संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

गोरेगाव येथील पीएमश्री जाम्यातीम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्री. मारवाडे यांना हा पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथील टाटा थिएटरमध्ये, दिनांक २२ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नींसह प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • कोविड काळातील उल्लेखनीय कार्य

कोविडच्या अभूतपूर्व संकटकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी श्री. मारवाडे यांनी गणित विषयाचा सेतू अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमाचा लाभ राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना झाला. याच काळात त्यांनी ऑनलाईन नवोदय वर्ग घेऊन जिल्हाभर विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवले. त्यांच्या या उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले.

या नवोन्मेषी कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय “उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार” देखील मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्राप्त झाला होता.

  • विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम

आजही ते विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. प्रत्यक्ष जीवनाशी निगडित शिक्षणाच्या प्रयोगशील पद्धती ते वर्गात वापरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात व अभ्यासगतीत मोठी वाढ होत आहे.

  • समाजाकडून गौरव व प्रशंसा

या पुरस्कारामुळे फक्त सौन्दड गावाचाच नव्हे तर संपूर्ण सडक अर्जुनी तालुका आणि गोंदिया जिल्हा गौरवला गेला आहे. गावात व जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून मारवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

आपल्या या यशाचे श्रेय श्री. मारवाडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, डायटचे हिवारे सर, विशाल डोंगरे सर, मेश्राम सर, शिक्षक मित्र व संपूर्ण मारवाडे परिवाराला दिले.

  • शिक्षकांचा सन्मान – समाजाचा सन्मान

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौरवोद्गार काढले की, “शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवतात. समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद शिक्षकांकडे असते. राज्यभरातील गुणवंत शिक्षकांचा गौरव हा आपल्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे.”

मारवाडे यांच्या कार्यामुळे “गुरु हा खरा राष्ट्रनिर्माता” या विचाराला उजाळा मिळाला असून, त्यांच्या सत्कारामुळे गोंदिया जिल्ह्याचा मान अभिमानाने उंचावला आहे.