गोंदिया : ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबविणे, राज्य सरकारने जारी केलेले वादग्रस्त शासन आदेश (जी.आर.) तात्काळ रद्द करणे, ओबीसी समाजाची जातिवार जनगणना करणे तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना करावी या प्रमुख मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने २१ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा मोर्चा यशस्वीरीत्या संपन्न केला.
कुळवा नाका येथून सुरुवात झालेला मोर्चा गोंदिया शहरातील प्रमुख मार्गांवरून जयस्तंभ चौकात पोहोचला. जय ओबीसी, जय संविधान, एक ओबीसी लाख ओबीसी या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. मोर्चादरम्यान समाजकार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत मागण्यांवर ठाम भूमिका मांडली.
- मोर्च्यात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या
ओबीसी समाजात मराठा समाजाची घुसखोरी तात्काळ थांबवावी. राज्य सरकारने २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेले वादग्रस्त शासन आदेश रद्द करण्यात यावेत. ओबीसीसह सर्व समाजांची जातिवार जनगणना तातडीने करण्यात यावी. रब्बी हंगाम २०२५ मध्ये शेतकऱ्यांनी विकलेल्या धानाचे पैसे शासकीय खरेदी केंद्रांमार्फत त्वरित अदा करावेत. पोलीस, शिक्षण यांसह सर्व विभागांच्या बिंदुनामावलीतील अनियमितता दूर करून ओबीसींना न्याय मिळवून द्यावा.
- नेत्यांचा पाठिंबा व इशारा
मोर्च्याला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहून सकल ओबीसी समाजाच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. यामध्ये आमदार विजय वाडेट्टीवार, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजकुमार बडोले, आमदार परिणय दादा फुके, तसेच खासदार डॉ. प्रशांत पडोळे आणि खासदार डॉ. नामदेवराव किरसाण, यांचा समावेश होता. काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
नेत्यांनी शासनाला इशारा दिला की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नागपूर आणि मुंबई येथे आणखी मोठे मोर्चे काढले जातील.
ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बबलु कटरे यांच्या मार्गदर्शनात ओबीसी मोर्चा शिस्तबद्ध व यशस्वी पद्धतीने पार पडला. तर संपूर्ण जिल्ह्यातून ओबीसी बांधव येथे उपस्थित झाले होते, सडक अर्जुनी येथील तालुका अध्यक्ष दिनेश हुकरे यांनी देखील आपल्या तालुक्यातून हजारो कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आणले होते, माधव तरोने, तुकाराम राणे, भूमेश्वर शेन्डे, पुष्पा ताई खोटले यांचे मार्गदर्शन लाभले. मोर्चादरम्यान प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला असून संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्च्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी समाजाची ताकद, संघटितपणा व एकजूट ठळकपणे दिसून आली.