अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील भरनोली ग्रामपंचायतीचे विभाजन होवून भरनोली व राजोली दोन स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन.
1 min read

अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील शेवटचा टोक असलेल्या भरनोली ग्रामपंचायतीमध्ये भरनोली, राजोली, तीरखुरी, खडकी, सायगांव, ही पाच महसूली गावे व नवीनटोला,तुकुम, शिवरामटोला, बकीटोला,नांगलडाहे, बोरटोला अश्या एकूण बारा गांवाचा समावेश आहे.
सदर क्षेत्र दुर्गम असून काही गावांचे ग्रामपंचायत भरनोली चे अंतर ७ कि.मी. पेक्षा जास्त आहे. तर भरनोली व राजोली या प्रमुख दोन गावामध्ये सुद्धा ५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे नागरिकांना कामाकाजासाठी बरीच पायपीट करावी लागत होती व प्रशासनास सुद्धा अडचणीचे ठरत होते. सदर ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास साडेचार हजार पेक्षा जास्त आहे. सबब सदर ग्रामपंचायतीचे विभाजन करून राजोली स्वतंत्र ग्रामपंचायत करावी अशी, अनेक वर्षापासून मागणी होती त्यासाठी ग्रामस्थानी अनेकदा आंदोलन केली होती. मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थानी बहिष्कार टाकला होता. ग्रामस्थानी व श्री योगेश नाकाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्षयांनी मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचेकडे मागणी केली. ग्रामस्थांची मागणी रास्त असल्याने मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी विभाजनाच्या ठरावाचा जिल्हाधिकारी गोंदिया, विभागीय आयुक्त नागपूर व ग्राम विकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने भरनोली ग्रामपंचायतीचे विभाजन करून भरनोली, तीरखुरी, खडकी हे स्वतंत्र गाव व राजोली, सायगाव हे स्वतंत्र गाव म्हणून ओळखले जातील अशी शासनाच्या ग्रामविकास विभागाने अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२२ रोजी काढली आहे.
भरनोली व राजोली स्वतंत्र दोन ग्रामपंचायती स्थापन झाल्यामुळे मागणी पूर्ण होऊन ग्रामस्थांची पायपीट थांबणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे आभार मानले.