‘ड’ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करा- खा. अशोक नेते.
1 min read• ‘ड’ वर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करा- खा. अशोक नेते.
• गरीब, कामगारांना हक्काचे घरकुल देण्याची मागणी.
• खासदार अशोक नेते यांची नियम 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत मागणी.
गडचिरोली,09 डिसेंबर 2021-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकरी, मजूर, कामगार दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. हलाखीच्या परिस्थितीतही काटकसर करुन आवश्यक वस्तूंची खरेदी ते करतात मात्र केंद्र शासनाने टीव्ही, मोबाईल फ्रिज व मोटार सायकल असलेल्या शेतकऱ्यांची नावे ड’ यादीत समाविष्ट केल्याने त्यांना केंद्र सरकारच्या आवास योजने पासून वंचित राहावे लागत आहे. याची जाणीव ठेवून ‘ड’ वर्गातील सर्वसामान्य, गरीब, कामगार व नागरिकांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी नियम 377 अधीन सुचनेअंतर्गत आज दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी लोकसभेत केली व या नागरिकांच्या घरकुलाच्या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.
गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात ‘अ’ तथा ‘ब ‘ वर्गवारीतील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे परंतु ज्या नागरिकांची नावे ड वर्गवारीत समाविष्ट आहेत अशा नागरिकांना घरकुल साठी असलेल्या जाचक अटीमुळे घरकुल नामंजूर करण्यात आले. त्यामुळे गरीब नागरिकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2022 पर्यंत सर्व गरीब नागरिकांना घरकुल देण्याचा संकल्प केलेला आहे. हा त्यांच्या उपक्रम प्रशंसनीय आहे व यासाठी मी केंद्र शासनाचे आभार मानतो मात्र घरकुलासाठी अशा जाचक अटी असल्याने गरिबांचे घरकूलचे स्वप्न अधातंरीच राहणार आहे. याकडे लक्ष देऊन ड वर्गातील नागरिकांसाठी घरकुलासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत केली व या घरकुलाच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
लोकसभेत निवेदन देतांना खासदार अशोक नेते म्हणाले, केंद्र सरकारने घरकुल देतांना अनेक जाचक अटी लादलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने घरामध्ये 2 खोल्यापेक्षा अधिक खोल्या नसाव्यात, दुचाकी व चारचाकी वाहन नसावे, दूरध्वनी नसावा, , 5 एकर पेक्षा अधिक जमीन नसावी, तसेच एका व्यक्तीचे उत्पन्न दहा हजार पेक्षा अधिक नसावे या जाचक अटींचा समावेश आहे. परंतु लोकसभा क्षेत्रातील शेतकरी शेताकडे ये- जा करण्यासाठी दुचाकी वाहनांचा उपयोग करतात तेही काटकसर केलेल्या रकमेतुन जुनी मोटार सायकल घेऊन करतात तसेच रोजगार हमी योजनेच्या मिळकतीतुन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवितात.
महिन्याकाठी 10 हजार रुपये उत्पन्न कमावणारे शेतकरी सुद्धा घराचे बांधकाम करू शकत नाही. त्यामुळे माझी शासनाला विंनंती आहे की, ड वर्गवारी तील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करून सर्वसामान्य जनतेला हक्काचे घर द्यावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत केली व या महत्वाच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.