विदर्भ पटवारी संघाचे विविध 29 मागण्यांसाठी बेमुदत संप.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी, दिनांक – 29 ऑक्टोबर 2021 – विदर्भ पटवारी संघाने विविध 29 मागण्यांसाठी गुरुवार 29 ऑक्टोंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे तलाठी साजा मधील अनेक कामे खोळंबण्याच्या मार्गावर आहेत. पटवारी संघाने शासनाला दिलेल्या अल्टिमेटम नुसार पटवारी संघाचे तालुक्यातील पटवारी आंदोलनात सहभागी होऊन तहसील कार्यालयासमोर संप पुकारला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्याने 25 ऑक्टोंबर पासून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू झाले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पटवारी संघाने याच मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारले होते. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित झाले होते.
मात्र शासनाने संघाच्या मागण्यांची पूर्तता केली नाही. परिणामी 25 ऑक्टोंबर पासून काळ्याफिती लावून या आंदोलनाची पुन्हा सुरुवात झाली. त्यानुसार आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाद्वारे या संपाला सुरुवात झाली. 3 नोव्हेंबरला डिजिटल सिग्नेचर तहसील कार्यालयात जमा करून 8 नोव्हेंबर पासून बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा तलाठी, मंडळ अधिकारी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये दोन तलाठ्यांचे प्रलंबित ठेवण्यात आलेले मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती करणे, लॅपटॉप व प्रिंटर पुरविणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, कोरोणा काळात मृत पावलेल्याना 50 लाखांचे विमा कवच देणे, सेवा पुस्तिका अद्यावत करणे, वेतनवाढ लागू करणे अश्या 29 मागण्यांसह विदर्भ पटवारी संघाने बेमुदत संप पुकारला आहे. सदर मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात हे आंदोलन अजून तीव्र होईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
त्याच बरोबर आज अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालय समोर तलाठी यांच्या आंदोलनात 1 तास सहभागी होऊन वनविभागाचे कर्मचारी व ग्राम सेवक कर्मचारी यांनी सहकार्य केला आहे, शासनाकडे विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाल आहे.