News24 Today

Latest News in Hindi

कारवाईच्या भीतीने परमबीर सिंग चे देशाबाहेर पलायन…

मुंबई,वृत्तसेवा,30 सप्टेंबर 2021 : अँटिलिया स्फोटकं, मनसुख हिरेन खून प्रकरण आणि त्यानंतर राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे गायब आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स, तसेच ठाणे पोलिसांनी लूकआऊटची नोटीस बजावूनही सिंग तपास यंत्रणांपुढे हजर झाले नाहीत. अटक होण्याच्या भीतीने परमबीर सिंग यांनी देश सोडून पलायन केले असावे, असा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

अँटिलिया स्फोटकं प्रकरणात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएने परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. परमबीर सिंग हे ५ मे पासून सुटीवर गेले आहेत. वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदविला होता. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात सिंग यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे. परमबीर सिंग यांना ऑगस्टमध्ये समन्स बजावण्यात आलं होतं. त्याला सिंग यांनी काहीही उत्तर दिलं नव्हतं. हरियाणातील चंदीगड आणि रोहतक येथील त्यांच्या निवासस्थानीही पोलिस अधिकारी जाऊन आले होते. पण, त्यावेळी त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता.

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीसह दाखल विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांकडून लूकआऊट नोटीसही बजावण्यात आलेली होती. त्याबाबत पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडे तपासणी केली होती, त्यात सिंग यांच्या परदेशी प्रवासाची कोणतीही नोंद सापडलेली नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल समितीने वारंवार समन्स बजावूनही अनुपस्थित राहणाऱ्या परमबीर सिंह यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला होते. चांदिवाल समितीने हे वॉरंट जारी करून त्याची अंमलबजावणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत करण्याचे निर्देश राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले होते.

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी या वॉरंट अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सीआयडीच्या पथकावर सोपवली होती. त्यानुसार सीआयडीचे एक पथक सिंग यांच्या संभाव्य सर्व ठिकाणी गेले होते. त्यात मुंबईतील मलबारहिलसह चंदीगढ येथील घरीही सीआयडीचे पथक गेले होते. मात्र, दोन्ही ठिकाणी परमबीर सिंह हे आढळले नाहीत.

दरम्यान, यापूर्वीही पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही आणि तीन वेळा दंड ठोठावूनही हजेरी न लावल्याने समितीने परमबीर सिंग यांना शेवटची संधी देत 7 सप्टेंबरच्या सुनावणीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले होते. त्यादिवशी हजेरी न लावल्यास वॉरंट काढण्याचा इशाराही दिला होता. पण त्यानंतरही परमबीर सिंग चांदिवाल समितीच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे अखेर समितीने याप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधात वॉरंट जारी केला होता. राज्य सरकारने कारवाईचा फास आवळल्यानेच परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याची चर्चा रंगली आहे.अशी माहिती एका न्यूज पोर्टल ने प्रकाशित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *