गोंदिया पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल.

गुन्ह्यांच्या तपासात वेग, अचूकता आणि पारदर्शकता वाढणार — पोलीस अधीक्षक गोरख भामरे.

गोंदिया :गुन्ह्यांचा उलगडा जलद, वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल झाली आहे. या व्हॅनचे अनावरण ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य शासनाच्या धोरणानुसार आणि मा. महासंचालक (न्याय व तांत्रिक) यांच्या वतीने ही व्हॅन गोंदिया जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ नुसार, सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या साहाय्याने गुन्ह्याच्या ठिकाणीच प्राथमिक पुरावे गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेत वेळेची बचत होऊन कार्यक्षमतेत आणि विश्वासार्हतेत वाढ होईल.

व्हॅनमध्ये अत्याधुनिक फॉरेन्सिक उपकरणे, डिजिटल फॉरेन्सिक प्रणाली, डीएनए सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच फॉरेन्सिक किट्स, तज्ज्ञ कर्मचारी आणि क्राईम सीन अप्लिकेशनचा समावेश असलेली ही व्हॅन सायबर गुन्हे, खून, अपघात व इतर गंभीर गुन्ह्यांच्या तपासात उपयुक्त ठरणार आहे.

या अनावरणप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे म्हणाले की, “फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर करून तपास यंत्रणा अधिक मजबूत आणि पारदर्शक बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या व्हॅनच्या मदतीने गुन्ह्यांचा उलगडा अधिक वेगाने आणि वैज्ञानिक पद्धतीने होणार आहे.”

याप्रसंगी श्री. पुरुषोत्तम अहेरकर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), श्री. शेवते (पोलीस निरीक्षक, अतिरिक्त कार्यकारी पोलीस उपअधीक्षक – मुख्यालय), श्री. राहुल दुरसेलवार (अंगुलीमुद्रा शाखा) हे उपस्थित होते.

निकट भविष्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्व चार उपविभागांना अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्याची योजना पोलिस विभागाने आखली आहे.