कोरची : शहरात विजेचा लपंडाव आणि चोरीची वाढती घटना.
1 min read
पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
कोरची, 08 जुलै 2022 – मागील काही महिन्यापासून कोरची शहरात विद्युत विभागाने डोकेदुखी वाढविली असून दिवसातून २५ ते ३० वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरात भुरट्या चोरांचा सुद्धा उद्रेक वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुका हा आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुका असून तालुक्याचे मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे. तालुक्यात कुठलेही मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे चार महिने शेतीचे काम करून बहुतेक लोक हे बाहेर कमवायला जातात. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे बहुतेक लोकांचे रोजगार गेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित काही भुरटे चोर तयार झाले असावेत असा अंदाज वर्तविला जात आहे.
विद्युत विभागाचे संपूर्ण तालुक्यात पूर्ण ढिसाळ कारभार सुरू असून वरिष्ठांनी आपले लक्ष फक्त वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. दिवसातून निम्म्या वेळात विद्युत पुरवठा खंडित राहत असून सुद्धा वीज बिल हे अव्वाच्या सव्वा येत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात काही असे शेतकरी सुद्धा आहेत ज्यांच्याकडे मिटर नसताना सुद्धा वीजबिल पाठवण्यात येत असून त्यांना तात्काळ वीज बिल भरण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.
काही महिन्यापूर्वी कोरची येथील विद्युत पुरवठा हा आमगाव येथून चिचगड मार्गे देण्यात आला होता त्यावेळेस तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीतपणे सुरू राहत असल्याचे दिसून येत होते. परंतु काही महिन्यापासून विद्युत पुरवठा हा कुरखेडा तालुक्यातून व इमर्जन्सी च्या वेळेस चिचगड अशा दोन पर्याय असून सुद्धा विद्युत विभाग पूर्णपणे सेवा देण्यास विफल होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या शाळांना सुरुवात झाली असून तसेच शेतीचे हंगाम सुरू असल्यामुळे बहुतेक काम हे ऑनलाइन पद्धतीने करावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत ये-जा करणाऱ्या विद्युत पुरवठामुळे व्यापाऱ्यांचा महागड्या उपकरणावर सुद्धा दुष्परिणाम होऊन महागड्या मशीनमध्ये बिघाड होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या संपूर्ण देश हे आजादी का अमृत महोत्सव साजरे करीत आहे परंतु कोरची तालुका हा खरच स्वतंत्र झाला आहे का? असा सुद्धा प्रश्न तालुक्यातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
(प्रतिनिधी दिनेश बनकर)