नवाब मलिकांना मोठा धक्का; ‘ईडी’कडून मालमत्ता जप्त!
1 min read
महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.गोवावाला कंपाउडमधील व्यावसायिक जागा आणि उस्मानाबादमधील १४८ एकर जमीन आणि बांद्रामधील दोन फ्लॅटवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या नवाब मलिक यांच्या स्वत:च्या नावावर तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.
आजच सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिक यांनी न्यायालयाकडे तत्काळ सुटकेची मागणी केलेली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक यांच्यावर हसिना पारकर यांच्या मालकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप असून, त्यांनी ३०० कोटींची जमीन केवळ ५५ लाखांना खरेदी केल्याचा आरोपही आहे. या संपूर्ण व्यवहारात मलिक यांच्यावर मनी लॉन्डिरगचा आणि अंडरवर्ल्डशी व १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. याशिवाय ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केलेला आहे. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
