ओमिक्रॉन वेरिएंट चा देशात शिरकाव, कर्नाटकात आढळले २ रुग्ण…
1 min read
वृत्तसेवा,02 डिसेंबर 2021-संपूर्ण जगाची काळजी वाढवणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूने अखेर भारतात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरियन्टची लागण झालेले देशातील पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळलेले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. हे दोन्ही पुरूष रुग्ण असून एकाचे वय ४६ आहे तर एक रुग्ण ६६ वर्षांचे आहेत. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील लोक आणि त्या लोकांच्या संपर्कातील लोकांची ओळख पटली असून सगळ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशीही माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.जीनोम अनुक्रमण द्वारे या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
या दोन्ही रुग्णांनी कोणतेही गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत, तसेच जगभरात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्येही कोणतीही गंभीर लक्षणं आढळून आलेली नसल्याचे अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यामुळे या व्हेरिअंटला घाबरण्याची गरज नाही, पण सगळ्यांनी कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
ओमिक्रॉन व्हेरिअन्टच्या संसर्गाचा धोका किती?
याच पत्रकार परिषदेमध्ये अग्रवाल यांनी ओमिक्रॉन च्या संसर्गाचा धोका कोरोनाच्या इतर व्हेरिएन्टपेक्षा पाच पटींनी जास्त असल्याचे सांगितले आहे. तसेच आतापर्यंत जगातील २९ देशांमध्ये या व्हेरिएन्टचे ३७३ रुग्ण आढळले असल्याचेही त्यांनी सांगितले. २५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वप्रथम हा व्हेरिअंट आढळून आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिअंटला ‘Variant Of concern’गटात टाकले आहे.
अशी माहिती मैक्स महाराष्ट्र ने प्रकाशित केली.
